झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाचे तालुका स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
झरे
माडगुळे ता. आटपाडी येथे झालेल्या तालुका स्तरावरील क्रीडा स्पर्धेत झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये झरे पंचक्रोशी जनता विद्यालय झरे व गदिमा हायस्कूल माडगुळे यांच्यात अतिशय अटीतटीच्या झालेल्या खो-खो च्या सामन्यात 14 वर्षे वयोगटातील मुलींनी खिलाडू वृत्तीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर 14 वर्षे वयोगटातील मुलांनी खो-खो सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
तसेच 100 मी. धावणे या स्पर्धेत निशिगंधा दयानंद वाघमारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर 400 मी. धावणे स्पर्धेत अक्षदा दाजीराम पारेकर तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. श्री. साहेबराव चवरे, सचिव भीमाशंकर स्वामी, मुख्याध्यापक देवानंद घोणते व सर्व शिक्षक स्टाफ यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक बिरू घोरपडे, महेंद्र यादव, भास्कर चौधरी व पारेकरवाडीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज दणाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
झरे पंचक्रोशी जनता विद्यालयाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने परिसरात नावलौकिक मिळवलेला आहे. सलग पंधरा वर्षे 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या विद्यालयाने विविध कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. डोंगर, वाडी, वस्त्यांवरील मुलांच्या शिक्षणासाठी येथील शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यासाठी प्रा. श्री. साहेबराव चवरे, सचिव भीमाशंकर स्वामी यांचे यासाठी सदैव पाठबळ व मार्गदर्शन मिळत असते. अल्पावधीतच या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केल्याने विद्यालयात प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडत असते.