ग्रामपंचायत कर भरा व लाखोंची बक्षिसे मिळवा
आंधळी (ता. माण) ग्रामपंचायतीची कल्पक योजना;ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धिरेनकुमार भोसले
दहिवडी, ता. ३० : महाराष्ट्रातील बहुतांशी ग्रामपंचायतींसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ग्रामपंचायत कर वसुलीसाठी माण तालुक्यातील आंधळी ग्रामपंचायतीने अतिशय कल्पक योजना राबवली आहे. ग्रामपंचायत कर भरा व लाखोंची बक्षिसे मिळवा अशी ही योजना असून विशेष म्हणजे यात सर्व बक्षिसे सुध्दा ग्रामस्थांनीच दिली आहेत.
जागर ग्रामविकासाचा म्हणत आंधळी गावाचे सरपंच दादासाहेब काळे यांनी सर्व पदाधिकारी, कर्मचारी, जेष्ठ नेतेमंडळी यांना सोबत घेत कर वसुलीसाठी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दसरा-दिपावली निमित्त नियमीत व थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबासाठी भव्य बक्षिस योजना जाहीर करण्यात आली आहे.
………
चौकट :
आंधळी ग्रामपंचायत
लोकसंख्या ४९००
कुटुंब संख्या – १०००
नियमित कर येणे – ६४८९३८ /-
थकबाकी – ९७७१३० /-
बक्षिस योजना सुरु झाल्यापासून जमा झालेला एकूण कर – १२२००० /-
……….
*भव्य बक्षिस योजना कालावधी
१६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३. सोडत १३ नोव्हेंबर २०२३
- नियमित अथवा थकबाकी असणाऱ्या कुटुंबास ५००/- रुपयांच्या पटीत कुपन मिळेल.
- २५००/- रुपये वा त्यापेक्षा जास्त कर भरणाऱ्या प्रत्येक कुटुंबास जास्तीत जास्त ५ कुपन मिळतील.
- ५००/- रुपयांपेक्षा कमी परंतू नियमित कर भरणाऱ्या कुटुंबास सुध्दा एक कुपन मिळेल.
- टि. व्ही., फ्रीज, पिठाची गिरणी, वाॅशिंग मशीन, कुलर, पंखा, मिक्सर, पाणी जार, इस्त्री, कचरापेटी अशी एकूण ३८ बक्षिसे.
……..
वैशिष्ट्य : वरील सर्व बक्षिसे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे दिली असून यात ग्रामपंचायतीने एक रुपया सुध्दा खर्च केलेला नाही.
……..
चौकट :
“कर वसुलीचे अतिशय जिकरीचे व किचकट काम सहज व सोपे व्हावे यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्यासाठी ही प्रोत्साहनपर बक्षिस योजना राबविली आहे. मला खात्री या योजनेमुळे आम्ही जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करु.”
दादासाहेब काळे, सरपंच, आंधळी.
……
“ग्रामस्थांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी कर वसुली अतिशय महत्वाची असते. त्यामुळे ग्रामस्थांनी जास्तीत जास्त कर भरणा करावा व या बक्षिस योजनेचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो.”
अर्जुन काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य.
……
“या चांगल्या उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आम्ही या योजनेत बक्षिस दिले आहे.” बापूराव पवार, जोतिराम दडस, अभिजित भोसले, डि. एस. भोसले, माने ज्वेलर्स, संजय काळे, सतिश शेंडे, सुधाकर काळे, राजेंद्र वाघमोडे, अशोक शेंडे, शिवाजी काळे, शशिकांत जाधव, यदाभाऊ काळे, गणेश गोरे ग्रामस्थ, आंधळी.
……
ऑफर कालावधीत कर भरणाऱ्या सर्व कुटुंबांना सरपंच दादासाहेब काळे यांच्या प्रेम फाऊंडेशन आंधळी यांच्याकडून एक आकर्षक बॅग देण्यात येणार आहे.
…….
“कर कुणालाबी चुकणार नाय. अन कर भरुन बक्षिस मिळत आसल तर चांगलंच हाय की. म्हणून म्या लगिच कर भरुन टाकलाय.”
सविता खरात, ग्रामस्थ, आंधळी.
…….