भाग्यदीप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे बिल अदा करू नका-नगरसेवक रुपेश मोरे
घंटागाडया खराब करून अंदाजपत्रकाप्रमाणे काम न केल्याचा आरोप
दहिवडी : ता.३१
दहिवडी नगरपंचायतीच्या घंटागाड्यांची नादुरुस्ती करून अंदाजपत्रकाप्रमाणे काम न केल्याने भाग्यदिप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला तीन महिन्यांचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी नगरसेवक रुपेश मोरे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दहिवडी नगरपंचायतीच्या घनकचऱ्याची वार्षिक निविदा भाग्यदिप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आली होती.
मात्र भाग्यदिप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीने घनकचऱ्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे केलेले नाही. त्याशिवाय नगरपंचायतीच्या वापरलेल्या घंटागाड्या पूर्णपणे त्यांनी खराब केल्या असून त्यांची देखभाल आणि दुरुस्ती अजिबात ही केली नसल्याचा आरोप नगरसेवक रुपेश मोरे यांनी केला आहे.
घंटागाड्यांना सध्या चाके नसून दहिवडी नगरपंचायतीच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला त्या चाकांऐवजी जॅकवर उभ्या आहेत. त्यामुळे वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला शेवटच्या तीन महिन्यांचे बिल अदा न करण्याची मागणी नगरसेवक रुपेश मोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
चौकट :
त्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाका
नगरपंचायतीच्या घंटागाड्या खराब करून अतोनात नुकसान करणाऱ्या आणि अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणाऱ्या भाग्यदिप्स वेस्ट मॅनेजमेंट कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे.
नगरसेवक रुपेश मोरे,न.पं.दहिवडी