पत्रकार सुनील पाटील यांचा सत्कार संपन्न
तांदुळवाडी ता .वाळवा येथील विवेक ग्रंथालयाचे अध्यक्ष, तथा दैनिक तरुण भारत संवादचे आष्टा प्रतिनिधी पत्रकार सुनील एकनाथ पाटील यांची महाराष्ट्र शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली. या निवडीबद्दल सुनील पाटील यांच्यावर आष्टा शहर आणि वारणा पंचक्रोशीतून अभिनंदनचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सुनील पाटील हे गेली चोवीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहेत.
ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढावी यासाठी त्यांनी विवेक ग्रंथालयाची स्थापना केली. ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले. गेली दोन तपे ते पत्रकारिता क्षेत्रात आहेत. साप्ताहिक वारणेचा वाघ यामधून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातील कार्यास प्रारंभ केला. गेली 24 वर्षे ते दैनिक तरुण भारत साठी लिखाण करीत आहेत. नवोदित पत्रकारांचे ते मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. याचबरोबर सामाजिक कार्यातही त्यांनी स्वतःला झोकून घेतले आहे.
नुकतीच त्यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड केली. 15 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2029 या काळासाठी सुनील पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली आहे. जिल्हाधिकारी सांगली यांच्या वतीने त्यांना ओळखपत्र, निवड पत्र, सन्मानपत्र तसेच शिक्का देण्यात आला. या निवडीबद्दल इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या आष्टा शाखेत संस्थेचे चेअरमन संग्रामसिंह पाटील आणि व्हाईस चेअरमन अधिकराव चव्हाण यांच्या हस्ते सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक बबनदादा थोटे, पतसंस्थेचे जनरल मॅनेंजर राजाराम कटारे, मोहनराव शिंदे, संचालक दादासो शेळके,व सल्लागार संचालक अनिल पाटील, प्रभाकर जाधव, सतीश माळी,उदय कुशिरे, सुनील जाधव, रणजीत पाटील, सुनील माने उपस्थित होते.
याप्रसंगी संग्रामसिंह पाटील यांनी सुनील पाटील यांच्या वाटचालीचे कौतुक करून त्यांना शुभेच्छाही दिल्या.स्वागत आणि प्रास्ताविक दादासो शेळके यांनी केले. आभार संस्थेचे जनरल मॅनेंजर राजाराम कटारे यांनी मानले.