आटपाडी प्रतिनिधी –
आज कारगिल दिन म्हणून साजरा करत असताना ज्या जवानांनी देशासाठी बलिदान दिले त्यांच्या स्मृतीचा जागर करण्याच्या निमित्ताने….
17 वर्षापूर्वी ” कारगिल ऑपरेशन विजय’ मध्ये जिल्ह्यातील दोन जवानांनी बलिदान दिले.. तब्बल १७ वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांच्या रूपात जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात घुसखोरी करत ‘एलओसी’ अर्थात नियंत्रण रेषा भारताचा भूभाग काबीज केला होता. द्रास, बटालिक, कारगिल या क्षेत्रात जिगरबाज भारतीय सैन्याने ६० दिवस प्राणाची बाजी लावून पाकिस्तानी सैन्याला पळवून लावले.
यात ५०० हून अधिक जवान शहीद झाले. यामध्ये सांगली जिल्ह्यातील हवालदार सुरेश गणपती चव्हाण (करोली टी, ता. कवठेमहांकाळ) आणि महादेव नामदेव पाटील (वडगाव, ता. ताररगाव) यांचा समावेश होता.
दिनांक २६ रोजी कारगिल विजय दिवस’ साजरा करत असताना या दोन जवानांच्या शौर्याची आठवण करून नतमस्तक होणे हीच श्रद्धांजली ठरेल. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांच्या रूपात मे १९९९ मध्ये नियंत्रण रेषा पार करत जम्मू-काश्मीरमधील कारगिल परिसरात घुसखोरी करत कब्जा केला. दोन्ही कुटुंबांना आधार असणारे शहीद चव्हाण यांच्या वीरपत्नी श्रीमती फुलाबाई चव्हाण यांना केंद्र शासनातून गॅस एजन्सी दिली गेली.
तसेच शासकीय स्तरावरून मोठी मदत झाली. तर शहीद पाटील यांच्या वीरमाता जनाबाई पाटील यांना सावळज येथे गॅस एजन्सी दिली गेली. दोन्ही कुटुंबात आजही वीर जवानांच्या स्मृती जपल्या आहेत. प्रदेशात पाकिस्तानी सैन्याने छावण्या उभारल्या. त्यांना हुसकावून लावणे हे एक खडतर आव्हान होते. परंतु विविध रेजिमेंटच्या भारतीय जवानांनी गगनचुंबी पर्वतांचा कब्जा घेण्यासाठी प्राणाची बाजी लावली. पर्वतावरून तोफा आणि सततचा गोळीबार असताना सुद्धा सैनिकांनी तब्बल ६० दिवस कडवा संघर्ष केला
. या युद्धात जिल्ह्यातील दोन जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली. महार रेजिमेंटचे सुरेश चव्हाण….कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली टी येथील सुरेश चव्हाण हे महार रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी या युद्धात अतुलनीय पराक्रम केला. ता. ६ जुलै १९९९ रोजी ‘ऑपरेशन विजय’ मोहीम सुरू असताना चव्हाण यांच्या जवळच शत्रूच्या तोफेचा गोळा येऊन पडला आणि त्याचा क्षणात स्फोट होऊन त्याचे छरे चव्हाण यांच्या शरीरात घुसले, ते जागीच धारातीर्थी पडले.
पॅरा रेजिमेंटचे महादेव पाटील…
तासगाव तालुक्यातील वडगाव येथील महादेव पाटील हे पॅरा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. ऑपरेशन विजय मोहिमेत ता. २४ जुलै रोजी ते जम्मू-काश्मीर परिसरात पाक घुसखोर सैनिकांशी लढत असताना. शत्रूच्या गोळ्यांनी त्यांचा वेध घेतला. जिल्ह्याचा दुसरा जवान या युद्धात शहीद झाला.
त्यानंतर दोनच दिवसांनी घुसखोर पाक सैनिकांना हाकलून लावत भारतीय जवानांनी ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी केले. भारत मातेला ना’पाक’ सैनिकांच्या तावडीतून मुक्त करत २६ जुलैला कारगिल परिसरात भारताचा तिरंगा फडकला. हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करताना दोन शहिदांना सर्वत्र श्रद्धांजली वाहिली गेली.
भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या गेलेल्या या युद्धातील दोन सुवर्णपाने आपल्या जिल्ह्यातील आहेत हे अभिमानास्पद आहे. इतर जवानांनी देखील उत्कृष्ट कामगिरी बजावली. अनेक सैनिक जखमी झाले. शहीद चव्हाण आणि पाटील यांच्या शौर्यस्मृती आज ठसठशीत आहेत.
चौकट…
जिल्ह्याची शौर्याची परंपरा आजही कायम आहे. १९४९ पासून २०१३ पर्यंत जिल्ह्यातील १५६ जवान शहीद झाले. तर ८० जवानांनी युद्धात आणि मोहिमेत शौर्यपदके पटकावली. सद्यः स्थितीत जिल्ह्यात सुमारे २१ हजार माजी सैनिक आहेत. …..
फोटो…शहीद सुरेश गणपती चव्हाण