खटाव माण अँग्रो गाठला सहा लाखाचे विक्रमी गाळपाचा पल्ला
१५ फेब्रुवारी पर्यंतचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
मायणी:- दत्ता कोळी

खटाव-माण तालुका अँग्रो ,पडळ साखर कारखाना यंदाच्या हंगामात आतापर्यंतच्या उच्चांकी विक्रमी गाळपाकडे वाटचाल करीत असून आज अखेर तब्बल सहा लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण केला आहे.कारखान्याच्या गत तिन्ही हंगामातील आजवरच्या गाळपातील हा उच्चांक ठरत असतो.याचबरोबर को-जन प्रकल्प,बॅगस,कंपोस्ट खत,मळी यांचेही उत्पादन यंदाच्या हंगामातील उच्चांकी झाले आहे. त्याचबरोबर १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आलेल्या ऊसाचे बिल प्रतिटन २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती ,कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे व संचालिका प्रीतीताई घार्गे यांनी दिली.

खटाव माण साखर कारखान्याचा तिसरा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने व नियोजन पद्धतीने सुरू असून कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला एफ,आर,पी नुसार वेळेत ऊस बिल अदा केली आहे. २०२१-२२ चा गळीत हंगाम २१ ऑक्टोबर रोजी सुरू झाला असून या गळीत हंगामात ७ लाख ९० हजार मेट्रिक टन एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट घेऊन प्रति दिन ४ हजार ५०० मेट्रिक टन क्षमतेने गाळप सुरू आहे. १५ फेब्रुवारी अखेर ५,१७,१८० मेट्रिक टन गाळप झाले असून ११.१२% इतका साखर उतारा घेऊन ५,७१,८५० क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली आहे.
१५ फेब्रुवारी पर्यंत गाळपास आलेल्या उसाला यापुर्वी प्रतिटन २५०० रुपये प्रमाणे आजअखेर ९० कोटी ७९ लाख ७२ हजार ५०० रुपये संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत व १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान गाळपास आलेल्या १,३३,९९५ मे. टन उसाला २५०० प्रमाणे ३३ कोटी ४९ लाख ८७ हजार ५०० रक्कम संबंधित ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्या खात्यावर ०३ मार्च २०२२ रोजी जमा केले असल्याची माहिती संचालकांनी दिली.
कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे, को. चेअरमन मनोजदादा घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांच्या दूरदृष्टीने योग्य प्रकारे आपली वाटचाल करीत आहे. गाळपास येणाऱ्या उसाचे वेळेत बिल देणारा कारखाना असा नावलौकिक निर्माण झालेला आहे. शेतकरी व कामगार वर्गाचे संचालक मंडळाने कौतुक केले असून यावर्षी निश्चित केलेले उद्दिष्ठ पार करण्यात आम्ही यशस्वी होऊ हा विश्वास कारखान्याचे संचालक विक्रम घोरपडे व संचालिका प्रीती घार्गे यांचेसह संचालक मंडळाने व्यक्त केला.